ढाक बहिरी
| कळकरायचा सुळका |
एकूण खर्च :- रु २५/- प्रत्येकी
सहभाग :- मी, राजेश, विकास, अनिल, संतोष, कुमार, संतोष, मधुकर, महेश
बावी पोखरणी झरे ! टाकी विशाल सुंदरे
कडे कपाटे दुर्कूटे ! पाहो जाता भयची वाटे !!
| ढाक बहिरी ला अशी कसरत करावी लागते |
आत्ताच जुलै मध्ये आम्ही ढाक ला आलो होतो. परंतु धुकं, वारा व पावसाने घातलेल्या थैमानामुळे आम्हाला बहिरीचे दर्शन घेता नाही आले. ही खंत मनात असल्यामुळे आम्ही पुन्हा एकदा बहिरीच्या दर्शनासाठी सज्ज झालो.
पुन्हा वादब मार्गे ढाक ला जाण्यासाठी आम्ही कर्जत एसटी स्टॅन्ड गाठलं. परंतू स्टॅन्ड वर एका गावकऱ्याने आम्हाला सांडशी गावातून जाण्याचा सल्ला दिला. कारण वदब वरून ढाक ला पांच ते सहा तासांचा अवधी लागतो व सांडशी हून फक्त अडीच तीन तास. मग आम्ही निर्णय घेतला सांडशी वरून जाण्याचा कारण वेळही वाचेल व आणखी एक नवीन वाट पायाखाली घालता येईल. पहाटे चार वाजताच्या सांडशी बसने आम्ही अर्ध्या तासात सांडशी ला पोहोचलो. दोन तास शाळेच्या आवारात गुलाबी थंडीत शेकोटी पेटवून गाण्यांची मजा लुटली. पहाटे एका गावकऱ्याला गुहेत सोडण्यासाठी ५०/- रुपयात तयार केले.
![]() |
| ढाक ची चढाई |
सांडशी गाव हे ढाक च्या अगदी पायथ्यालाच आहे. ढाक किल्ला थोडासा डावीकडे ठेऊन व भैरोबाचा डोंगर उजवी कडे ठेऊन सरळ वरची वाट धरली. मध्ये पठारावर चार पाच घरांची वाडी लागते . तिथून बहिरी ची गुहा डोळ्यासमोर ठेऊन थोडे रानातून नंतर ओहोळातून वर यावे लागते. कातळ कडा लागला की उजवी कडे दिसतो तो एक उंच सुळका व अगदी डोक्यावर बहिरीची गुहा.
![]() |
| शेवटची चढाई |
त्या कड्या मध्ये पायऱ्या खोदलेल्या असल्या तरी त्या चढून जायला कसरत करावी लागते.
अगदी शेवटी एक लाकडाचे खोड एका रोप व वेलीच्या आधारे ठेवले आहे. त्याच्या आधाराने च वर यावे लागते.
शेवटचा टप्पा तर अतिशय सहासपूर्ण आहे. परंतु एकमेकांना व्यवस्थित मार्गदर्शन करीत आम्ही सर्व सुखरूप गुहेत पोहोचलो.
| ढाक बहिरीची गुहा |
गुहेत शेंदूर फासलेला बहिरी देव आहे, व त्याच्या बाजूला पाण्याच्या टाक्या आहेत.
येथे काही भांडी आहेत जी वापरून स्वच्छ करून पुन्हा ठेऊन द्यायची अशी रीत आहे.
बहिरी हून कळकरायचा सुळका, राजमाची किल्ला, नागफणी, इर्शाळगड, प्रबळगड, व्यवस्थित दिसतो, तर दूरवर माणिकगड व कर्नाळा ही दिसला.
उतरताना उन्हाचा फार त्रास झाला. त्यामुळे सांडशी ला यायला साडेतीन तास लागले. असा हा ट्रेक फारच छान व साहस पूर्ण झाला.
नंतर पुन्हा चार वेळा ह्या ठिकाणी जाण्याचा योग आला एकदा तर शेजारील कळकरायचा सुळका क्लाइंब करण्याची संधी पिनॅकल ग्रुप च्या वतीने मिळाली.
(ह्या ट्रेक चे फोटो नसल्यामुळे नंतरच्या ट्रेक चे फोटो संदर्भा साठी देत आहे.)





