27 Apr 2020

ढाक बहिरी १९९५

ढाक बहिरी 

कळकरायचा सुळका

दिनांक :- १७ डिसेंबर १९९५
एकूण खर्च :- रु २५/- प्रत्येकी
सहभाग :- मी, राजेश, विकास, अनिल, संतोष,  कुमार, संतोष, मधुकर, महेश


बावी पोखरणी झरे ! टाकी विशाल सुंदरे 
कडे कपाटे दुर्कूटे ! पाहो जाता भयची वाटे !!


ढाक बहिरी ला अशी कसरत करावी लागते
     आत्ताच जुलै मध्ये आम्ही ढाक ला आलो होतो. परंतु धुकं, वारा व पावसाने घातलेल्या थैमानामुळे आम्हाला बहिरीचे दर्शन घेता नाही आले. ही खंत मनात असल्यामुळे आम्ही पुन्हा एकदा बहिरीच्या दर्शनासाठी सज्ज झालो. 

     पुन्हा वादब मार्गे ढाक ला जाण्यासाठी आम्ही कर्जत एसटी स्टॅन्ड गाठलं. परंतू स्टॅन्ड वर एका गावकऱ्याने आम्हाला सांडशी गावातून जाण्याचा सल्ला दिला. कारण वदब वरून ढाक ला पांच ते सहा तासांचा अवधी लागतो व सांडशी हून फक्त अडीच तीन तास. मग आम्ही निर्णय घेतला सांडशी वरून जाण्याचा कारण वेळही वाचेल व आणखी एक नवीन वाट पायाखाली घालता येईल. पहाटे चार वाजताच्या सांडशी बसने आम्ही अर्ध्या तासात सांडशी ला पोहोचलो. दोन तास शाळेच्या आवारात गुलाबी थंडीत शेकोटी पेटवून गाण्यांची मजा लुटली. पहाटे एका गावकऱ्याला गुहेत सोडण्यासाठी ५०/- रुपयात तयार केले.




     
ढाक ची चढाई


     सांडशी गाव हे ढाक च्या अगदी पायथ्यालाच आहे. ढाक किल्ला थोडासा डावीकडे ठेऊन व भैरोबाचा डोंगर उजवी कडे ठेऊन सरळ वरची वाट धरली. मध्ये पठारावर चार पाच घरांची वाडी लागते . तिथून बहिरी ची गुहा डोळ्यासमोर ठेऊन थोडे रानातून नंतर ओहोळातून वर यावे लागते. कातळ कडा लागला की उजवी कडे दिसतो तो एक उंच सुळका व अगदी डोक्यावर बहिरीची गुहा.
     




शेवटची चढाई 

     त्या कड्या मध्ये पायऱ्या खोदलेल्या असल्या तरी त्या चढून जायला कसरत करावी लागते.

     अगदी शेवटी एक लाकडाचे खोड एका रोप व वेलीच्या आधारे ठेवले आहे. त्याच्या आधाराने च वर यावे लागते. 








     शेवटचा टप्पा तर अतिशय सहासपूर्ण आहे. परंतु एकमेकांना व्यवस्थित मार्गदर्शन करीत आम्ही सर्व सुखरूप गुहेत पोहोचलो.











ढाक बहिरीची गुहा 

     गुहेत शेंदूर फासलेला बहिरी देव आहे, व त्याच्या बाजूला पाण्याच्या टाक्या आहेत.


     येथे काही भांडी आहेत जी वापरून स्वच्छ करून पुन्हा ठेऊन द्यायची अशी रीत आहे. 









     बहिरी हून कळकरायचा सुळका, राजमाची किल्ला, नागफणी, इर्शाळगड, प्रबळगड, व्यवस्थित दिसतो, तर दूरवर माणिकगड व कर्नाळा ही दिसला.

ढाक वरून दिसणारा राजमाची किल्ला 






    









     उतरताना उन्हाचा फार त्रास झाला. त्यामुळे सांडशी ला यायला साडेतीन तास लागले. असा हा ट्रेक फारच छान व साहस पूर्ण झाला. 


     नंतर पुन्हा चार वेळा ह्या ठिकाणी जाण्याचा योग आला एकदा तर शेजारील कळकरायचा सुळका क्लाइंब करण्याची संधी पिनॅकल ग्रुप च्या वतीने मिळाली.

(ह्या ट्रेक चे फोटो नसल्यामुळे नंतरच्या ट्रेक चे फोटो संदर्भा साठी देत आहे.)




26 Apr 2020

रायगड शिवथर 1993

रायगड शिवथर घळ

दिनांक :- २२-२३ ऑगस्ट १९९३
एकूण खर्च :- रु १८०/- प्रत्येकी
सहभाग :- मी, राजेश, विकास, अनिल, उज्वला, सुषमा, साधना, संतोष आंब्रे, संतोष पवार, सुशील, मीना आणि माधुरी.

     या ट्रेक चे वैशिष्ट म्हणजे आमच्या ग्रुप चे "स्वच्छंदी" असे नामकरण दिनांक २२-८-१९९४ रोजी रायगडाच्या पायथ्याशी पाचाड मुक्कामी करण्यात आले. रायगड संबंधी लिहावे तितके थोडे. रायगडला तसे तीनदा जाऊन आलेलो, तरीही संपूर्ण गड काही पायाखालून गेला नव्हता. ती इच्छा ह्या वेळेस पूर्ण झाली. चित दरवाजा समोरील वाघाचे डोळे, नाना दरवाजा व वाघ दरवाजा ह्या ठिकाणांची भर पडली.

     तसे रायगड मी चार वेळा वेगवेगळ्या प्रकारे पाहिला व अनुभवला. पहिल्यांदा दुपारी भर उन्हात घामाघूम होऊन ताक-सरबत पित रायगड चढलो व हिंडलो. दुस-यांदा भर पावसात नेहमीच्याच रस्त्याने रायगड चढलो व पाऊस वारा व धुक्याचा लपंडाव पहिला. तिस-यांदा चांदण्या रात्री गड चढलो व भवानी मंदिर, तसेच हिरकणी बुरुज हि ठिकाणे नव्याने पहिली आणि रायगड प्रदक्षिणा घातली. तर चवथ्यांदा नेहमीची वाट सोडून इतिहास कालीन वहिवाटात असलेली नाना दरवाज्यातून जाणाऱ्या वाटेने रायगड चढून गेलो.

     पावसात भिजलेला, धुक्याच्या लाटा अंगावर घेत, हिरवी शाल नेसलेला रायगड अतिशय सुंदर दिसत होता. रायगड काही तासात फिरून झाला. ह्या वेळेस वाघ दरवाजा (चोर दरवाजा) जेथून मराठ्यांचे छत्रपती राजाराम महाराज मुघलांच्या वेढ्यातून सुखरूप निसटले त्याचे दर्शन घेतले. तृप्त मनाने चितदारवाज्याने रायगड पायउतार झालो. एसटी ने महाड मार्गे शिवथर ला रात्री पोहोचलो. सुशील व मीना महाड वरून मुंबई ला माघारी गेले.

     शिवथर बद्दल अशी जास्त माहिती आमच्याकडे नव्हती. शिवथर ला रात्री एसटी बस मधून उतरलो तर समोर चारी बाजूस दाट काळोख. कुठे जावे कळत नव्हते. तेव्हा एसटी ड्राइवर ने गाडीच्या हेड लाईट लावून आम्हाला रास्ता दाखवला. काळोखातून वाट काढत आश्रमात पोहोचलो. आश्रमातील वातावरण अतिशय शांत व स्वच्छ. तेथे जेवण बनविण्यास भांडी तशेच झोपायला अंथरून पांघरून हि मिळते. सोय अतिशय उत्तम सर्व कसे नीटनेटके व शांत. रात्री शांत झोपायचे व पहाटे लवकर उठायचे असल्यामुळे प्रथमच सर्व शांत झोपले. रात्रीची निरव शांतता व पाण्याचा खळखळाट अश्या वातावरणात शांत झोप लागली. पहाटे उठल्यावर सर्व अंथरून पांघरून व्यवस्थित घडी करून ठेवले व समर्थांच्या दर्शनास गेलो. बाजूला ऐश पैसे अशी घळ त्यात समर्थांची मूर्ती जवळच दुधाप्रमाणे फेसाळणारा धबधबा. रात्री येणारा धबधब्याचा आवाज इतका जवळून येत असावा असे वाटलेच नव्हते. इथे जवळच पाण्यात मनसोक्त डुंबलो. एकदा तरी पावसाळ्यात भेट द्यावे असे ठिकाण. चारी बाजूला हिरवेगार उंचच डोंगर, जवळच कावळा किल्ला. खरोखरच "दासबोध" लिहिण्यास समर्थानी हेच निसर्गरम्य ठिकाण का निवडलं हे तेथे गेल्यावरच कळते.

     समर्थानी काव्यातून केलेले शिवथर चे वर्णन खालील प्रमाणे. 

गिरीचे मस्तकी गंगा ! तेथुनि चालिती बळे !
धबाबा लोटती धारा ! धबाबा तोय आदळे !!१!! 
गर्जतो मेघ तो सिंधु ! ध्वनिकल्लोळ उठिला ! 
कड्याशी आदळे धारा ! वात आवर्त होतसे !!२!!



24 Apr 2020

कर्नाळा सुळका १९९३

कर्नाळा सुळका चढाई 

( चित्र क्र.1 )
दिनांक :- २६ डिसेंबर १९९३
एकूण खर्च :- रु ५३/- प्रत्येकी 
सहभाग :- मी, सुशील, राजेश, अनिल, संतोष, नितीन.  


     "जैत रे जैत" चित्रपट पहिला होता पण तो थोडक्यात आम्ही आज अनुभवला. कोकणात जाता येता हा कर्नाळ्याचा अंगठा नेहमी खुणावत असतो ( चित्र क्र.1 ). कर्नाळा किल्ला तसा पाहिला होता परंतु ह्या वेळेस आम्हाला खास सुळका सर करायचा होता. सुशील नुकताच एका ग्रुप बरोबर जाऊन आल्यामुळे आम्हाला व्यवस्थित व सुखरूप नेण्याचे आव्हान त्याने स्वीकारले होते. भीमाशंकर च्या शिडी घाटाचा दोन वर्षाचा अनुभव आणि प्रचंड आत्मविश्वास आमच्याकडे  होता.

     आदल्या रात्री सगळे सुशील च्या घरी कळव्याला जमले. सकाळी पहिल्या बस ने पनवेल व पुढे पेण बस ने कर्नाळा गाठलं. कर्नाळा पक्षी अभयारण्यात मधोमध उभा आहे हा किल्ला. भल्या पहाटे साधारण तासाभरात किल्ल्यात पोहोचलो. किल्ला चारी बाजूने तटबंदी ने बंदिस्त आहे. बुरुज, दरवाजे, काही बांधकामे, मंदिरे, तोफा आणि मधोमध साधारण १२५ फूट उंच सुळका. सुळक्याच्या पायथ्यालाच कोणीतरी पडून मृत्यू पावल्याची नोंद होती. परंतु त्याची भीती कोणीच बाळगली नाही. भीती होती ती फक्त मधमाश्यांची कारण सुळका चारी बाजुंनी मधमाश्यांच्या पोळ्यांनी वेढलेला होता. आवाज व धुराने मधमाश्या सहज उठतात. म्हणून आम्ही भल्या पहाटे गडावर आलो होतो. आमच्यात नितीन हा नवीन असल्यामुळे त्याला सुळक्यावर येण्यास मनाई होती.  किल्ल्यावर पर्यटक ग्रुप कोणीच नव्हते. सर्व कसे शांत होते.



     देवाला साकडे घातले, सुळक्याला मनोमन विनवले, छत्रपतींचा जयजयकार केला आणि सुळक्याला भिडलो. सुशील ने प्रथम वर जाऊन आधार व्यवस्थित असल्याची खात्री करून आम्हाला वर येण्यास सांगितले. अगदी सुरवातीला साधारण दहा फुटाचा टप्पाच कठीण होता. एक झाडाच्या खोडाचाच आधार होता. एव्हडी कसरत पूर्ण केल्यावर बाकी तसे सोपं होतं. नंतर आम्ही सहज एक दुसऱ्याच्या मदतीने सुळक्यावर पोहोचलो. मध्ये एकदा थोडे खाली वळून पहिले तर खूप खोल व भयानक असे जाणवले. परंतु एव्हडे धाडस करून सुळक्यावर पोहोचल्यावर जो आनंद मिळाला तो शब्दात काय वर्णावा. आपण उंच आभाळात गेलो असल्याची जाणीव झाली.

लिंगोबाचा डोंगूर आभाळी गेला !
ठाकर गाडी तिथे कधी नाय गेला !!
चित्रपट "जैत रे जैत".



     आम्ही दुर्बिणीतून सर्व आसमंत न्याहाळला. लांबवर एक एक ग्रुप गडावर येताना दिसू लागले होते. चढाई तशी सोपी होती पण उतरताना खूपच सावध एकमेकांचा आधार घेत खाली  उतरून आलो. आता भुकेची जाणीव झाली. सह्याद्रीचे आभार मानले आणि डबे उघडले. येथे सुळक्या खाली भरपूर गुंफा आणि पाण्याच्या टाक्या आहेत. त्यातील पाणी म्हणजे थंड मधुर जणू अमृतच.
   
     थोड्यावेळाने किल्ल्यावर पिकनिक वाल्यांची गर्दी वाढली. तसा गोंगाट हि वाढला. आणि ज्याची भीती होती तेच घडलं. एका मुलाने सहज एक दगड मधमाश्यांच्या पोळ्यावर मारला. आणि थोड्या वेळाने एक एक करून मधमाश्यांची फौज सर्वांवर तुटून पडली. आम्ही चादरी आणलेल्या असल्यामुळे सर्वानी स्वतःला संपूर्ण झाकून गुपचूप बसून राहिलो. जवळ जवळ तासाभराने मधमाश्या शांत झ्याल्या . एक मुलगा घाबरून धावत सुटला ज्यामुळे हजारोनी मधमाश्या त्याच्या पाठी लागल्या. त्याच्या संपूर्ण पाठीवर, मानेवर मधमाश्यांची दंश केला. म्हणजे चूक कोणाची व सजा कोणाला. आम्ही विचार केला हाच प्रसंग जर सुळका चढताना ओढवला असता तर "आसमानसे गिरा और खजूर पे अटका " अशी अवस्था झाली असती.. परंतु आम्ही हा धोका लक्षात ठेवूनच पहाटे लवकर मोहीम पार पडली व आम्ही सुखरूप घरी पोहोचलो.

     आता जेव्हा जेव्हा जात येता कर्नाळ्याचा अंगठा दिसतो ऊर अभिमानाने भरून येतो.

     ( ह्या ट्रेक चे फोटो नसल्यामुळे नंतरच्या ट्रेक चे फोटो संदर्भा साठी देत आहे.)






20 Apr 2020

भीमाशंकर १९९२

भीमाशंकर १० ऑगस्ट १९९२ (दुसरा श्रावणी सोमवार)

माझा हा सर्वात पहिला ट्रेक. ज्यानी मला ट्रेकिंग ची आवड निर्माण केली असा हा ट्रेक.

चित्र क्र. १ 

     सुशील ने मला आग्रह केला ट्रेक साठी. खरंतर सुशील च्या बहिणीचा म्हणजेच शुभा चा ग्रुप सुनील (दादा), संजीवनी, नाले, पद्मा, सतीश, अविनाश, शिंदे व इतर.....

     शनिवारी दिनांक ८ ला रात्री सुशील च्या घरी कळव्याला सगळे जमलो. सॅक, स्लीपिंग मॅट, हंटर शुज हे शब्द पहिल्यांदा कानावर पडत होते. रात्रीच्या लोकल ने कर्जत गाठले. तिथून मोर्चा बस डेपोत वळवला. कर्जत डेपो हे ट्रेकर्स साठी हक्काची विश्रांतीची जागा. रात्र डेपोत काढून सकाळी बसने निघालो ते खांडस ला. कर्जत ते खांडस ह्या प्रवासाला ट्रेकर्स ने खचाखच भरलेल्या बस शिवाय पर्यायच नव्हता.
सह्याद्रीच्या माथ्यावर असलेल्या भीमाशंकर च्या पायथ्या शी वसलेलं रायगड जिल्ह्यातील छोटंसं टुमदार नितांत सुंदर असं गाव "खांडस". येथून भीमाशंकर ला दोन वाटा फुटतात. १.गणेश घाट २.शिडी घाट. अत्यंत कठीण फक्त अनुभवी ट्रेकर्स ना मोहात पाडणाऱ्या शिडी घाट ने आमची वाटचाल सुरु झाली ( चित्र क्र.२ ).

चित्र क्र. २

हिरवीगार शेतं, भरभरून वाहणारे ओढे, गणेश घाटातून जाणारी वाट, दोन तीन वाड्या मागे सोडून तासाभराच्या पायपीटाने सह्याद्रीच्या कुशीत शिरलो. आता चढाई ला सुरवात झाली होती. थोड्या चढाईने वाट एका डोंगर कड्याला भिडली आणि सुरू झाला शिडी घाटातला थरार.

     पहिल्याच रॉक पॅच नंतर समोर येते एक कपार जी ओलांडायला ठेवलेय एक लाकडी शिडी ( चित्र क्र.३ ).

चित्र क्र.४
चित्र क्र.३

एका किनाऱ्याला वळसा घातल्यावर ( चित्र क्र.४ ) समोर येतो तो आमचा आवडता रॉक पॅच. एका सरळ भिंतीत दगडात स्फटिकांमुळे एक आडवी रेघ तयार झालेय. फक्त हातांनाच आधार. पुढे समोर येते ती एका घळीत ठेवलेली दुसरी लाकडी शिडी. 

चित्र क्र.५

थोड्या चढाई नंतर एक गुंफा ( चित्र क्र.५ ) स्वागत करते व सांगते थकला असाल थोडा विसावा घ्या. तिसऱ्या शिडी ची गंमतच होती. शिडी च्या पायऱ्या चढून वरच्या दोन टोकांवर उभे राहूनच हाताला आधार लागत होता (येथे उतरताना खूप कसरत करावी लागली). ( चित्र क्र.६ )

(चित्र क्र. ६)

पुढे एक असे वळण जे दगडाला मिठी मारूनच पार करावे लागते. नंतर एका धबधब्याशी जवळीक करून शेवटचा रॉक पॅच पार करून एका विस्तीर्ण ओहोळा जवळ जेवण उरकले. पुढे पठारावर गणेश घाटातली वाट हि येऊन मिळाली. पुढे पाहतो तर आणखी एक उंच डोंगर. एक अवघड आणि उभी चढण (ज्याचे आम्ही नंतर गुढघे घाट असं नामकरण केलं, कारण तिथे गुढघ्यांची वाट लागते). एवढा चढ चढल्यावर आम्ही ढगातच आलो. भर पावसात, तर कधी धुक्यात, तर कधी चक्क ढगांमध्ये वावरण्याचा माझा पहिलाच अनुभव. त्यातून शिडीचा रस्ता तर अफलातून. डोंगराच्या कड्यात ठेवलेल्या त्या तीन लाकडी शिड्या. वाटेत सुखावणारे झरे, धबधबे सारे कसे मनमोहून टाकणारं त्यातून ती खांडस हुन दिसणारी भीमाशंकर ची उंची. पुढे धुक्याने भरलेल्या दाट जंगलातली वाट. सहा सात तासांच्या पायपिट नंतर हि अजिबात न थकता कधी पोहोचलो ते कळलंच नाही. 

बारा ज्योतिर्लिंगा पैकी एक भीमाशंकर तसे गजबजलेले अतिशय सुंदर देऊळ, समोर चिमाजी अप्पानी ठेवलेली अजस्त्र घंटा. गुप्त भीमाशंकर तर अतिशय भारावून टाकणारे स्थान.

     असा हा  माझा अतिशय आवडता ट्रेक. 

सुंदर मूर्ति सुंदर गुण !
सुंदर कीर्ती सुंदर लक्षण !
सुंदर मठी देव आपण ! वास केला 
गिरिकंदरी सुंदरबन !
सुंदर वाहती जीवन !
त्यामध्ये सुंदर भुवन ! रघुनाथाचे 

टीप :- नंतर आमचा श्रावणी सोमवारी भीमाशंकर हा दर वर्षी चा ट्रेक झाल्यामुळे शिडी घाटाची बरीच पारायणे झाली. पूर्वीच्या लाकडी शिड्या, नंतर लोखंडी शिड्या, नंतर अल्युमिनियम च्या व्यवस्थित पायऱ्या असलेल्या शिड्या पहिल्या. आता तर पहिली एकच चांगली आधार असलेली लांबलचक शिडी टाकलेय. सर्व सुरक्षित झालंय पण पूर्वी चा थरार काही राहिला नाही. 


(पहिल्या ट्रेक चे फोटो नाहीत त्यामुळे नंतरच्या ट्रेक चे फोटो संदर्भा साठी देत आहे.)