1 Jan 2022

Happy New Year 2022


 

नमस्कार मित्रहो,

         आपण आज २०२२ च्या उंबरठ्यावर पोहोचलो आहोत. तसे २०२० आणि २०२१ बद्दल काय बोलावे. दोन्ही वर्ष कोरोनाच्या विळख्यात गेली. २०१९ साली जन्मलेल्या कोरोनाने २०२० साली संपूर्ण जगाला विळखा घातला. त्या विळख्यातच २०२१ सलात आपण पोहोचलोवर्षाच्या सुरवातीला कोरोनावर लस सापडली. म्हटलं आता सुटलो. पण पुन्हा लॉकडाऊन लागला. आता वर्षाच्या सरते क्षणी सगळे कोरोनाला सरसावले तर त्याची नवनवीन पिल्लं येताहेत. असं वाटत हि दोन्ही वर्ष अंतरिक्षात जाऊन त्या ब्लॅक होल मध्ये सोडून द्यावीत. तरी २०२१ ने काही चांगले ही दिले.

         वर्षाच्या सुरवातीला झाला माझ्या बकेट लिस्ट मधील एक ट्रेक AMK.

अजिंक्य हायकर्स च्या अनुभवी सोबत्यां बरोबर AMK म्हणजेच अलंग, मदन, कुलंग हे तीन किल्ले जे सर्व ट्रेकर्स चे स्वप्न असते ते पूर्ण झाले. नाशिक ला जाता येताना दुरून खुणावणारे, कळसुबाई च्या शिखरावरून अगदी जवळून न्याहाळलेले AMK . विस्तीर्ण  पसरलेला अलंग, सरळ आकाशात शिरलेला मदन आणि सुंदर मनमोहक कुलंग. तीनही किल्ले दुर्गम. सुंदर कातळात कोरलेल्या पायऱ्या परंतु सुरुंग लावून फोडल्यामुळे कठीण श्रेणीत जाऊन बसलेले. निसरड्या वाटा, घनदाट जंगल परंतु अतिशय देखणे. तटबंदी, दरवाजे, गुहा, पाण्याच्या टाक्या, भग्न अवशेष आणि बरेच काही

         वर्षाच्या शेवटी प्रथमच नर्मदा मातेला भेटण्याचा योग्य आला. एक छोटी परिक्रमा झाली. परिक्रमार्थींच्या भेटी झाल्या. पवित्र नर्मदेत डुबकी मारली आणि जन्मच सार्थक झालं. ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग , मंडलेश्वर, महेश्वर किल्ला, अतिशय सुंदर विस्तीर्ण असे नर्मदेचे घाट, महेश्वर किल्ल्यातील अहिल्याबाई होळकरांचा वाडा, भव्यदिव्य आणि कलाकुसर असलेली मंदिरे पहिली. आणि ज्या साठी आसुसलो होतो ते रावळखेडी असलेली बाजीराव पेशवे यांची समाधी. त्यांच्या लढाया, शौर्य, इतिहास सारे काही अद्भुत.  

         २०२२ खूप आशादायी, सुंदर, छान असे जाणार ह्यात शंकाच नाही. हे येणारं वर्ष मागील दोन वर्षाची सर्व कमतरता भरून काढेल इतकं सगळं चांगलं देणार आहे

शेवटी म्हणतात ना ...... 

आशाएँआशाएँआशाएँ

कुछ पाने की हो आस आस
कुछ अरमाँ हो जो ख़ास ख़ास
आशाएँ…. आशाएँ…. आशाएँ….

हर कोशिश में हो वार वार
करे दरियाओं को आर पार
आशाएँआशाएँआशाएँ

तूफानों को चीर के
मंज़िलों को छीन ले
आशाएँ खिले दिल की
उम्मीदें हँसे दिल की
अब मुश्किल नहीं कुछ भी, नहीं कुछ भी !!

नवीन वर्षाच्या तुम्हां सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा !!

 


27 Apr 2020

ढाक बहिरी १९९५

ढाक बहिरी 

कळकरायचा सुळका

दिनांक :- १७ डिसेंबर १९९५
एकूण खर्च :- रु २५/- प्रत्येकी
सहभाग :- मी, राजेश, विकास, अनिल, संतोष,  कुमार, संतोष, मधुकर, महेश


बावी पोखरणी झरे ! टाकी विशाल सुंदरे 
कडे कपाटे दुर्कूटे ! पाहो जाता भयची वाटे !!


ढाक बहिरी ला अशी कसरत करावी लागते
     आत्ताच जुलै मध्ये आम्ही ढाक ला आलो होतो. परंतु धुकं, वारा व पावसाने घातलेल्या थैमानामुळे आम्हाला बहिरीचे दर्शन घेता नाही आले. ही खंत मनात असल्यामुळे आम्ही पुन्हा एकदा बहिरीच्या दर्शनासाठी सज्ज झालो. 

     पुन्हा वादब मार्गे ढाक ला जाण्यासाठी आम्ही कर्जत एसटी स्टॅन्ड गाठलं. परंतू स्टॅन्ड वर एका गावकऱ्याने आम्हाला सांडशी गावातून जाण्याचा सल्ला दिला. कारण वदब वरून ढाक ला पांच ते सहा तासांचा अवधी लागतो व सांडशी हून फक्त अडीच तीन तास. मग आम्ही निर्णय घेतला सांडशी वरून जाण्याचा कारण वेळही वाचेल व आणखी एक नवीन वाट पायाखाली घालता येईल. पहाटे चार वाजताच्या सांडशी बसने आम्ही अर्ध्या तासात सांडशी ला पोहोचलो. दोन तास शाळेच्या आवारात गुलाबी थंडीत शेकोटी पेटवून गाण्यांची मजा लुटली. पहाटे एका गावकऱ्याला गुहेत सोडण्यासाठी ५०/- रुपयात तयार केले.




     
ढाक ची चढाई


     सांडशी गाव हे ढाक च्या अगदी पायथ्यालाच आहे. ढाक किल्ला थोडासा डावीकडे ठेऊन व भैरोबाचा डोंगर उजवी कडे ठेऊन सरळ वरची वाट धरली. मध्ये पठारावर चार पाच घरांची वाडी लागते . तिथून बहिरी ची गुहा डोळ्यासमोर ठेऊन थोडे रानातून नंतर ओहोळातून वर यावे लागते. कातळ कडा लागला की उजवी कडे दिसतो तो एक उंच सुळका व अगदी डोक्यावर बहिरीची गुहा.
     




शेवटची चढाई 

     त्या कड्या मध्ये पायऱ्या खोदलेल्या असल्या तरी त्या चढून जायला कसरत करावी लागते.

     अगदी शेवटी एक लाकडाचे खोड एका रोप व वेलीच्या आधारे ठेवले आहे. त्याच्या आधाराने च वर यावे लागते. 








     शेवटचा टप्पा तर अतिशय सहासपूर्ण आहे. परंतु एकमेकांना व्यवस्थित मार्गदर्शन करीत आम्ही सर्व सुखरूप गुहेत पोहोचलो.











ढाक बहिरीची गुहा 

     गुहेत शेंदूर फासलेला बहिरी देव आहे, व त्याच्या बाजूला पाण्याच्या टाक्या आहेत.


     येथे काही भांडी आहेत जी वापरून स्वच्छ करून पुन्हा ठेऊन द्यायची अशी रीत आहे. 









     बहिरी हून कळकरायचा सुळका, राजमाची किल्ला, नागफणी, इर्शाळगड, प्रबळगड, व्यवस्थित दिसतो, तर दूरवर माणिकगड व कर्नाळा ही दिसला.

ढाक वरून दिसणारा राजमाची किल्ला 






    









     उतरताना उन्हाचा फार त्रास झाला. त्यामुळे सांडशी ला यायला साडेतीन तास लागले. असा हा ट्रेक फारच छान व साहस पूर्ण झाला. 


     नंतर पुन्हा चार वेळा ह्या ठिकाणी जाण्याचा योग आला एकदा तर शेजारील कळकरायचा सुळका क्लाइंब करण्याची संधी पिनॅकल ग्रुप च्या वतीने मिळाली.

(ह्या ट्रेक चे फोटो नसल्यामुळे नंतरच्या ट्रेक चे फोटो संदर्भा साठी देत आहे.)